लेवा पाटीदार : लेवा पाटीदारांची गणना कुणब्यांमध्ये झालेली असल्याने १९११ नंतर स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नाही. सन १८७२ च्या जनगणनेनुसार संयुक्त खानदेशात यांची संख्या २५,५३५ होती. ते बहुतांश खानदेशाच्या पूर्व भागातच होते. महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारी ही जात प्रामुख्याने यावल, रावेर, एदलाबाद, भुसावळ व जळगाव तालुक्यांत आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यांत आढळते. एरंडोल तालुक्यातील नांदेड व साळवे, जामनेर तालुक्यातील हाताळे व इतर काही ठिकाणी वस्ती आहे. लेवा पाटीदारांची भाषा वऱ्हाडी मराठीशी जास्त मिळतीजुळती आहे. लेवा पाटीदारांच्या जात पंचायतीला भोरगांव म्हणत. भोरगांव पंचायत म्हणजे बारा पंचक्रोशीतील गावांचा समाजात विलक्षण दरारा होता. लग्नविषयक भांडणतंटे, सोडचिठी, संपत्तीविषयक, भाऊबंदकीचे तंटे तसेच जाततंटे ही पंचायत सोडवत असे. ही पंचायत पाडळसे व भोरटेक (यावल तालुका) या दोन्ही गावाजवळून वाहत असलेल्या मोर नदीच्या वाळवंटात वर्षात एकदाच घेतली जात असे.